औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या (१ ऑगस्ट) शेवटची तारीख आहे. काल काँग्रेस आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे ज्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावेळी कुळकर्णी हे मुंबईत वरिष्ठ नेत्यांसोबत होते. प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून मुलगा केदार याने अतिशय घाईघाईत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रशासनाला अद्याप बी फॉर्म मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे शहर काँग्रेसचे नेतेही यावेळी दूरच होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पारा चांगलाच तापला आहे. उमेदवारी मिळवण्यावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याचे अजूनही स्पष्ट होत आहे. काल दुपारी बाराच्या सुमारास मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली. लगोलग कुलकर्णी यांचा नगरसेवक मुलगा केदार अंबड येथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. सोबत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह दहा नगरसेवकांचा ताफा होता. दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी बाबुराव कुळकर्णी मुंबईत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत होते.
एवढी घाई कशासाठी ?
काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आमदार सुभाष झांबड आणि बाबुराव कुलकर्णी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गेल्यावेळी बाबुराव कुलकर्णी यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र अखेरचा तासाभरात घडलेल्या घडामोडी कुलकर्णी यांच्यासाठी धक्कादायक ठरल्या. पक्षाचा बी फॉर्म घेऊन झांबड यांनी लगेच उमेदवारी अर्जही दाखल केला होता. हा अनुभव लक्षात घेता या वेळी बाबूराव कुलकर्णी कमालीचे सावध झाले आहेत. एकीकडे त्यांनी मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या. दुसरीकडे त्यांचा मुलगा तयारीतच होता. पक्षाचा निरोप मिळताच मुलाला तातडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अंबडहुन 10 नगरसेवकांचा ताफा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आणि उमेदवारी अर्ज भरण्याचे सोपस्कार पार पडले.
सूचक म्हणून औरंगाबादेतील कुणीच नाही !
दरम्यान कुलकर्णी यांचा उमेदवारी अर्ज भरताना शहर तसेच जिल्हा काँग्रेसचे कोणीही नेते हजर नसल्याचे समजते. अर्ज भरण्याचा कोणताच गाजावाजा करण्यात आला नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनाच उमेदवारी अर्ज भरण्याची कल्पना नव्हती असे समजते.
अमावस्यामुळे केली घाई
उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. तर आज दुपारपासून अमावस्या सुरू होते. मुहूर्त साधण्यासाठी कुलकर्णी यांनी तातडीने कालच अर्ज दाखल केला असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना-भाजपचे उमेदवार अंबादास दानवे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विजय निश्चित : माजी आ.गोरंट्याल
स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने ज्येष्ठ नेते बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे सर्व नेते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे कुलकर्णी यांचा विजय निश्चित आहे.